भगीरथा
स्वर्गातून गंगा आणणा-या भगीरथा
तुझे कोरडवाहू वंशज आम्ही
गंगेतून वीस शतकांचे पाणी वाहून गेल्यावर
आजही असहाय्य झगडतो आहोत सनातन दुष्काळाशी
आमच्या हजारो गावांना जलसमाधी देऊन
धरणं बांधली मंत्रालयातील वातानुकूलित योजनाकारांनी
आणि आज आमच्या घामावर, रक्तावर
पुकपुकतात बड्या बागाईतदारांच्या मोटार सायकली
अडवल्या गेलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने
तरारली आहेत पिके विषमतेची
वाया गेलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाने
बेचिराख स्वप्ने तुझ्या कोरडवाहू वंशजाची
दुष्काळी वा-यावर डोलणारे सत्तेचे हिरवे सागर
बनवतात प्रत्येक कालव्याला एक दारिद्र्यरेषा
आणि कोरडवाहू खेड्यांचे आम्ही पुरातन रहिवासी
फिरतो पाण्याविना उध्वस्त दाहीदिशा
सत्ता मुठीत ठेवणारे साखरेचे हात
नासवतात आमची काळी आई
अन पाटापाटावर करून पाण्याचा काळाबाजार
कुंपणच येथे शेत खाई
बस्स झालं भगीरथा
आता तुझा कोरडवाहू वंशज
सगळेच बांध फोडील
(दै.मराठवाडा, २१ऑक्टोबर १९८४)
Comments
Post a Comment