मद्रास कॅफे - २५.८.२०१३


काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३......

आज "मद्रास कॅफे" बघितला.
आवडला.

जुन्या जखमांवरची खपली निघाली - पुन्हा एकदा.

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली.
मी "काळ्या बुधवारच्या कविता" लिहिल्या.
औरंगाबादच्या दै. मराठवाड्याने त्या छापल्या.

१९९१साली राजीव गांधींची हत्या झाली.
मी त्याच कविता परत दै.मराठवाड्याकडे पाठवल्या-खालील टिपणीसह.
"सद्यस्थिती वर्णन करताना आज माझ्या जुन्याच कविता उपयोगी पडाव्यात हा माझा व माझ्या पिढीचा पराभव आहे. आमच्या षंढत्वाचाच तो पुरावा!"
दै. मराठवाड्याने त्या परत छापल्या.

सन २०१३.
दहशतवाद जोरात आहे.
देशात परत एकदा उन्मादी वातावरण निर्माण केले जात आहे.
दाभोळकरांची हत्या झाली आहे.
बलात्कार होता आहेत
आया बहिणींवर, विचारांवर.....

विषमता व वैर कमी व्हावे
सज्जनशक्ती वाढावी
विवेकबुद्धी व वैज्ञानिक दृष्टीकोन असावा
असा आग्रह धरणारे आज जात्यात भरडले जात आहेत
आणि
सुपातही नसलेला मी
 फक्त
त्याच जुन्या कविता post करतो आहे-परत एकदा

माध्यम आधुनिक झाले एवढेच
बाकी काहीच बदलले नाही-न बाहेर, न आत
ब्लॉग असो वा सी.सी.टि.व्ही. फुटेज
त्याने फरक काय पडतो?
अस्पष्टता कायम आहे!
संशयाचा फायदा सर्वांना समान आहे!!

तर
परत एकदा पाच कविता
पाचोळा?
पालापाचोळा!

काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३......

एक

हिंसाचाराच्या हिडीस मंत्रोच्चाराबरोबर
अपरिहार्यपणे उगवलेला
अजून एक काळा बुधवार
सनातन कुबट धर्मग्रंथांच्या
बिभत्स चिवट पानापानातून
वाहिलेले स्वस्त रक्ताचे असहाय्य पाट
कशाला हवीत अण्वस्त्रे
माझ्या देशाचा सर्वनाश जाहीर करायला?
जातजमातवादाची क्रूझ आणि पर्शिंग
येथे पूर्वापार लावलेली
आमच्याच सत्तापिसाट नादान आईबापांनी
घराघरातून
***

दोन
संशयास्पद प्रार्थनाघरातून
भोळ्याभाबड्यांच्या (अंध) श्रद्धेवर साम्राज्य करणा-या
उन्मत्त धर्मपिसाटांनी
देवत्वाचे स्मगलिंग केलेले
हे प्रभो,
एवढे झाल्यावरसुद्धा
तुझे राजकारणी मौन काय दर्शवते?
हा तुझ्या मुस्कटदाबीचा परिणाम
का
तू नसल्याचाच नि:संदिग्ध पुरावा?
***
तीन
काळ्या बुधवारी हकनाक मेलेल्यांनो,
तुम्हाला श्रद्धांजली वाहताना
मी एवढेच म्हणेन -
तुम्ही जात्यात भरडला गेलात
आम्ही सुपात आहोत
तुम्ही का मारले गेलात? कोणास ठाऊक?
कदाचित आम्हीही मारले जाऊ
कधी पुरामूळे, कधी दुष्काळात,
कधी उष्णतेच्या लाटेत, कधी  मरणप्राय थंडीत
कधी जगण्याच्या हक्कासाठी मोर्चा काढला म्हणून
तर कधी काविळीच्या साथीत सुद्धा!
कदाचित निवडणुकीच्या तोंडावर
एखाद्या "राष्ट्रवादी युद्धात"  सुद्धा आम्ही मारले जाऊ
तर सांगायचे काय
माझ्या स्वर्गीय मित्रांनो,
मरायचं सगळ्यांनाच आहे या देशात
कळत - नकळत, हकनाक, क्वचित कधी हेतूपूर्वक
मग उगाच वाद कशाला
मरणाच्या प्रकाराबाबत?
असो.
***
चार
रावळपिंडीतील खोल तळघरातून
आणि वॉशिंग्टन मधील गगनचुंबी
कारस्थानगृहातून ठरवले जाते
भारतातील कोणत्या रस्त्यावर
कोणत्या कोंबड्यांना झुंजवायचे ते
सार्वभौम भारतातील स्वतंत्र नागरिकांनो,
तुम्हाला हे माहित आहे का?
***
पाच
लेबनानमधील यादवी
इराणमधला फंडामेंटालिझम
पाकिस्तानातील धर्मांधता
अमेरिकेतील माफिया
आणि
इथियोपियातील जीवघेणा दुष्काळसुद्धा
वाहवा!
सगळेच आहे की अशोकचक्राखाली!!
"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने
नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे"
*****









Comments

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

पाणी मागतात ...च्यायला

करोना - स्वगते