चार कविता - भारत बंदच्या निमित्ताने

 


घोडा लंबे रेसका है!

अश्वमेधाच्या घोडयाला तो अडवणार आहे !!

 

बोले सो निहाल, सत श्री अकाल, माझ्या भावांनो

वाहे गुरू, माझ्या बहिणींनो

सलाम, शेतक-यांनो. सलाम, तमाम भूमिहिनांनो

राम राम, ऊस तोडणी कामगारांनो

 

शेतीतून बाहेर पडणा-या तरूणांनो,

शेतीत राबराबूनही मान-सन्मानाचे पिक हाती न येणा-या मैत्रिणींनो,

स्वत:च्या देशातच निर्वासित झालेल्या टाळेबंद नागरिकांनो

शहरात मोलमजूरी करणा-या कोरडवाहूंनो,

ज्ञानबा-तुकाराम. पुंडलिक वरदा हारी विठठल

 

कौतुक  माऊली,

हमी भावाच्या  पांडुरंगाची ओढ लागलेल्या तुम्हा वारक-यांचं

कौतुक, तुमच्या सहनशक्त्तीचं

थंडीवा-यात, उन-पावसात, हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत

एका असमान लढयात उतरलेल्या वेडयापिरांचं

 

अखंड भारताच्या उन्मादी जयजयकारात

खंदक खोदुन 

अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून

पाणी-तोफा डागून

तुमचं स्वागत झालं

पण तुम्ही शांत राहिलात

कारण

या देशाच्या सातबा-यावर मूळ नोंद तुमची आहे

 

दिल्लीच्या वेशीवर

आज इतिहास कुस बदलतो आहे

कारण

धर्म, जात, प्रांत, लिंग ....

कोणत्याच ध्रुवीकरणाला तुम्ही बळी पडला नाहीत

वेळी अवेळी राष्ट्रवादाची उबळ येणा-यांना

तुम्ही विचारलंत, "हो का नाही"?

बैठकीतलं तुमचं जबरदस्त बोलकं मौन

जणू वादळापूर्वीची शांतता

अभिनंदन.

घोडा लंबे रेसका है!

अश्वमेधाच्या घोडयाला तो अडवणार आहे !!

 

                       - दोन -          

शेतीमाल कोठेही विका, स्वातंत्र्य आहे !

भावाचं काय घेऊन बसलात?

शंभर टक्के मिळणार !

कंत्राटदार व्यापा-याने शब्द फिरवला तर?

कोठेही जा, स्वातंत्र्य आहे!

हां, आपण काही कोणावर बंधने घालत नाही

शेती सोडायची आहे? स्वातंत्र्य आहे!

आत्महत्या करायची आहे?..स्वातंत्र्य आहे!

-    तीन -

एक वचनी रामाचे भक्त

रोज भूमिका बदलता आहेत

सत्तेवर येण्यापूर्वी स्वामीनाथन प्रिय

सत्ता मिळताच प्रतिज्ञापत्र दाखल - स्वामीनाथन अव्यवहारी

कधी "हमीभावाचं आश्वासन मूळी दिलंच नव्ह्तं"

तर कधी

"तुमचा स्वामीनाथन तर आमचा भावांतर शिवराज"

नाही तर चक्क अंदाजपत्रकात बतावणी 

"झाली की अंमलबजावणी, आम्हीच केली ती"

-    चार -

रामराज्यात डब्ल्यु टी ओ बसली सिंहासनावर

हमीभावाचा  राम नेहेमीसारखा वनवासात

अडाणी अंबानींची कॉर्पोरेट शेती फक्त आत्मनिर्भर

बाकींच्यांकरिता फक्त घोषणा

एम एस पी थी,

एम एस पी है,

एम एस पी रहेगी

 

प्रदीप पुरंदरे

(८ डिसेंबर २०२०)

 

 


Comments

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

करोना - स्वगते

आम्ही "त्यांच्या" बरोबर आहोत! तुम्ही?