लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक


प्रिय दादा,
लेक टायपिंगची बातमी ऎकली बाबा
पेपरात फोटू बघितलं
टिवी वर तर बघतच राह्यलो खुळ्यावानी
लै कौतिक वाटलं, दादा
भारी काम केलासा
उर अक्षी भरुन आला
आईचं सोड,
बापु आपला - एवढा कठिन मानूस
त्याचंबी डोळं पाणवलं बघ

दादा, सावित्री आलीया माहेराला
तुझ्यावर लै जीव होता तिचा
पन तू म्हनला
शहरातली पायजे, शिकलेली पायजे
नाराज झाली बिचारी
मला तर लै आवडली होती
ती भेटली आज
मला म्हनली-
कवा येनार दादासाहेब तुमचे?
शिकायला गेला शहराला अन परका झाला
हुरडा खायला येतुया फकस्त अन सारखं फोटु काढतया
त्याला म्हनव एवढं लेक टायपिंग करतुयास
जरा आमची चारीबी दे की दुरूस्त करून
कुटपन फुटती अन आमचंच बारं चढाचं
पानी काय भेटेना

दादा, येतुस कारं गावाकडं?
अरे, घे की बदली करुन
सायेब खुष आहे सद्या तुझ्यावर
आपल्या धरणावर लै गोंधळ हाय बाबा
जराशीक लावून दे की शिस्त
लोकं लै नाव घेतील तुझं
म्हातारी थकलीया, बापुसबी होईना पहिल्यासारखं

पन तुला कुठलं जमायला म्हना
वैनी मोडता घालणार
पोरांनाबी नाय करमणार गावाकडं
त्यातून इथल्या शाळा सगळ्या मराठी

बापु म्हनत होता
शेतीला पानी भेटेना अन शेतमालाला भाव मिळंना
औंदा काढायची म्हनतो जमीन
बख्खळ पैका येतुया म्हनं
रस्त्याला लागून आहे
तुझा फलॅट आनि माझं लगीन
उडवू म्हनतो बार

सावित्री विचारत होती मला तिच्या भावाकरता
म्हनली तुझा दादा तर नाही म्हनला
आता तू तरी नाय म्हनू नकोस
दादा, गणा तसा चांगलाय पन लै तापट
त्यात त्याचं शेत टेलला, चारी फुटलेली अन बारं चढाचं
सारखं भांडतुया रावसाहेबाशी
परवा तर पाटक-यावरच धावून गेला
भ्या वाटतीया, काही करून बसला तर?

जाऊदे. मरूदे. आमचं काय?
नेमीचं रडगाणं
तू मोठ्ठा हो
पुना कर लेक टायपिंग
वैनी म्हटली तर आमालाबी बोलिव बघायला

बापु गावात सांगत हिंडतोया
पोरगं आमचं लै गुणाचं

सांग वैनीला.. पोरांना
या परत हुरडा खायला
अन पान्याची बाटली विसरू नका बरका
तुमाला नाही पचत आमचं पानी

तुझी बहिणाबाई,
बळीराजाची लेक

            - प्रदीप पुरंदरे
              (२६ एप्रिल २०१२)



Comments

Popular posts from this blog

आम्ही "त्यांच्या" बरोबर आहोत! तुम्ही?

पाणी मागतात ...च्यायला