Sunday, July 10, 2016

सहा थेंब - दुष्काळाच्या निमित्ताने


शासन इतकी वर्षे टॅंकरवर होते
जमाना बदलला आता
अच्छे दिन आ गये
जेसीबी पोकलेनचे

पाणी न्यायालयाची पायरी चढले
जलहित याचिकांचा महापूर आला
आम्ही सांगतच होतो
मूळ दुखणे कॉलेजियम मध्ये आहे

कमिटया स्थापन होता आहेत
तसे आम्ही "कमिटेड" आहोत
दुष्काळ काय येतच असतात
शेवटी निसर्गापुढे कोणाचे काय चालणार?

ठिबक येणार
बघा,बघा, पाईपलाईन्सदेखील आल्या
नदीजोड होणार
अगदी आसेतू हिमाचल!

आणि
जलयुक्त शिवार तर कवाच झालं की राव
एक पाऊस झाला की बस...
रिमझेम के तराने लेके आयी बरसात!!

वाफाळलेला चहा प्या
गरमा गरम कांद्याची भजी खा
(कांदा जीवनावश्यक आहे)
आणि काय हा अरसिकपणा?
दुष्काळावर कसल्या चर्चा करता?
मेघदूत वाचा, मेघदूत!!!

-प्रदीप पुरंदरे
५जुलै २०१६
Wednesday, March 19, 2014

आम्ही "त्यांच्या" बरोबर आहोत! तुम्ही?जातजमात वाद व धार्मिक उन्माद,
बलात्कार व भ्रष्टाचार,
राजकीय टगेगिरी व चेल्याचपाट्यांची भांडवलशाही,
दुष्काळ, गारपिट आणि शेतक-यांच्या आत्महत्या,
रोजगार हमीतील चो-यामा-या  आणि भृणहत्या,
टॅंकरमागे धावणा-या बायाबापड्या आणि ऊसबाधा झालेले मग्रुर पुढारी
आसारामी अध्यात्म आणि सुदर्शन बाजार
असा विविधतेने नटलेला भारत देश..मेरा प्यारा हिंदोस्ता!
जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है ?
असा ‘प्यासा’ प्रश्न पुन्हा एकदा आसमंतात आहे.
तो विचारण्याचे धाडस दाखवणा-यांबरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

मोलकरणी, हमाल – माथाडी, कामगार, अंगणवाडी सेविका,  शेतकरी, शेतमजुर,
दलित, आदिवासी, शुद्रातिशुद्र आणि असहाय्य महिला
अशा असंघटितांच्या बाजूने आयुष्यभर लढणा-या ‘माणसां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

रेशन कार्ड, रोजगार, पेन्शन, सर्वांना शिक्षण, साक्षरता,
प्यायला पाणी, दुपारला भाकरी, रातच्याला वाईच अंथरूण पांघरूण.....
........... मागणं लै नाही बाप्पा
मूलभूत मागण्यांसाठी सतत आंदोलन करणा-या ‘साथी व कॉम्रेड’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

पर्यावरणस्नेही विकास
समन्यायी पाणीवाटप,
जलवंचितांच्या हक्काचं पाणी,
सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण,
बेछुट नागरिकरण व चंगळवाद,
शहरातील खड्ड्यात गेलेले रस्ते,
विस्थापितांचे पुनर्वसन,
छोट्या धरणांचा आग्रह,
एक ना दोन
असंख्य आघाड्यांवर संघर्ष करणा-या ‘मित्रां’बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

ज्यांच्याकडे पैसा नाही; चारित्र्य आहे
जमीन जुमला नाही; माणुसकी आहे
सत्तेची मस्ती नाही; दिनदुबळ्यांची साथ आहे
राणा भीमदेवी कंठाळी नाही; आर्जवी सूर आहे
पोकळ आश्वासने नाहीत; ठोस मागण्या आहेत
मृगजळ नाही; लॉंग मार्चची खात्री आहे
‘त्या कार्यकर्त्यां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

इतिहास कुस बदलतो आहे!
आपले भविष्य आपल्या हाती!!
आम्ही ‘आम आदमी’ बरोबर आहोत. तुम्ही?


प्रदीप पुरंदरे
१९ मार्च २०१४Monday, September 16, 2013

रांजण काही भरत नाही

मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना संबंधी द. १७ सप्टेंबर २०१३ रोजी औरंगाबाद येथे महामोर्चा निघणार आहे. त्या संदर्भात थोडे गद्य थोडे पद्य.आपण यांना पाहिलेत का?

अनेक वर्षांपूर्वी हरवले आहेत
- नदीखोरे अभिकरणे
- राज्य जल मंडळ
- राज्य जल परिषद
- एकात्मिक राज्य जल आराखडा
- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
- जलनीती.....जलकायदे
******

कालवा आहे तर धरण नाही
धरण आहे तर कालवा नाही
दोन्ही असेल तर पाणी नाही
पाणी असेल तर टेलपर्यंत पोहोचत नाही

कायदा आहे तर नियम नाही
नियम आहे तर करार नाही
करार आहे तर जी. आर. नाही
जी.आर. आहे तर परिपत्रक नाही


समिती आहे तर अहवाल नाही
अहवाल आहे तर शिफारस नाही
शिफारस आहे तर स्वीकार नाही
स्वीकार आहे तर अंमल नाही

नाथा घरची उलटी खूण
पाणी आहे......इच्छा नाही
रांजण काही भरत नाही
*****

Monday, August 26, 2013

मद्रास कॅफे - २५.८.२०१३


काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३......

आज "मद्रास कॅफे" बघितला.
आवडला.

जुन्या जखमांवरची खपली निघाली - पुन्हा एकदा.

१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली.
मी "काळ्या बुधवारच्या कविता" लिहिल्या.
औरंगाबादच्या दै. मराठवाड्याने त्या छापल्या.

१९९१साली राजीव गांधींची हत्या झाली.
मी त्याच कविता परत दै.मराठवाड्याकडे पाठवल्या-खालील टिपणीसह.
"सद्यस्थिती वर्णन करताना आज माझ्या जुन्याच कविता उपयोगी पडाव्यात हा माझा व माझ्या पिढीचा पराभव आहे. आमच्या षंढत्वाचाच तो पुरावा!"
दै. मराठवाड्याने त्या परत छापल्या.

सन २०१३.
दहशतवाद जोरात आहे.
देशात परत एकदा उन्मादी वातावरण निर्माण केले जात आहे.
दाभोळकरांची हत्या झाली आहे.
बलात्कार होता आहेत
आया बहिणींवर, विचारांवर.....

विषमता व वैर कमी व्हावे
सज्जनशक्ती वाढावी
विवेकबुद्धी व वैज्ञानिक दृष्टीकोन असावा
असा आग्रह धरणारे आज जात्यात भरडले जात आहेत
आणि
सुपातही नसलेला मी
 फक्त
त्याच जुन्या कविता post करतो आहे-परत एकदा

माध्यम आधुनिक झाले एवढेच
बाकी काहीच बदलले नाही-न बाहेर, न आत
ब्लॉग असो वा सी.सी.टि.व्ही. फुटेज
त्याने फरक काय पडतो?
अस्पष्टता कायम आहे!
संशयाचा फायदा सर्वांना समान आहे!!

तर
परत एकदा पाच कविता
पाचोळा?
पालापाचोळा!

काळ्या बुधवारच्या कविता-१९८४,१९९१,२०१३......

एक

हिंसाचाराच्या हिडीस मंत्रोच्चाराबरोबर
अपरिहार्यपणे उगवलेला
अजून एक काळा बुधवार
सनातन कुबट धर्मग्रंथांच्या
बिभत्स चिवट पानापानातून
वाहिलेले स्वस्त रक्ताचे असहाय्य पाट
कशाला हवीत अण्वस्त्रे
माझ्या देशाचा सर्वनाश जाहीर करायला?
जातजमातवादाची क्रूझ आणि पर्शिंग
येथे पूर्वापार लावलेली
आमच्याच सत्तापिसाट नादान आईबापांनी
घराघरातून
***

दोन
संशयास्पद प्रार्थनाघरातून
भोळ्याभाबड्यांच्या (अंध) श्रद्धेवर साम्राज्य करणा-या
उन्मत्त धर्मपिसाटांनी
देवत्वाचे स्मगलिंग केलेले
हे प्रभो,
एवढे झाल्यावरसुद्धा
तुझे राजकारणी मौन काय दर्शवते?
हा तुझ्या मुस्कटदाबीचा परिणाम
का
तू नसल्याचाच नि:संदिग्ध पुरावा?
***
तीन
काळ्या बुधवारी हकनाक मेलेल्यांनो,
तुम्हाला श्रद्धांजली वाहताना
मी एवढेच म्हणेन -
तुम्ही जात्यात भरडला गेलात
आम्ही सुपात आहोत
तुम्ही का मारले गेलात? कोणास ठाऊक?
कदाचित आम्हीही मारले जाऊ
कधी पुरामूळे, कधी दुष्काळात,
कधी उष्णतेच्या लाटेत, कधी  मरणप्राय थंडीत
कधी जगण्याच्या हक्कासाठी मोर्चा काढला म्हणून
तर कधी काविळीच्या साथीत सुद्धा!
कदाचित निवडणुकीच्या तोंडावर
एखाद्या "राष्ट्रवादी युद्धात"  सुद्धा आम्ही मारले जाऊ
तर सांगायचे काय
माझ्या स्वर्गीय मित्रांनो,
मरायचं सगळ्यांनाच आहे या देशात
कळत - नकळत, हकनाक, क्वचित कधी हेतूपूर्वक
मग उगाच वाद कशाला
मरणाच्या प्रकाराबाबत?
असो.
***
चार
रावळपिंडीतील खोल तळघरातून
आणि वॉशिंग्टन मधील गगनचुंबी
कारस्थानगृहातून ठरवले जाते
भारतातील कोणत्या रस्त्यावर
कोणत्या कोंबड्यांना झुंजवायचे ते
सार्वभौम भारतातील स्वतंत्र नागरिकांनो,
तुम्हाला हे माहित आहे का?
***
पाच
लेबनानमधील यादवी
इराणमधला फंडामेंटालिझम
पाकिस्तानातील धर्मांधता
अमेरिकेतील माफिया
आणि
इथियोपियातील जीवघेणा दुष्काळसुद्धा
वाहवा!
सगळेच आहे की अशोकचक्राखाली!!
"माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने
नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे"
*****

Tuesday, August 20, 2013

नरेंद्र दाभोलकर अमर रहेहत्या नव्हे
पुन्हा एकदा "वध" झाला
हा नथुरामचा वारसा
हे राज्य माफियांचे

दाभोळकर सिर्फ झांकी है
फुले, शाहू,आंबेडकर बाकी है
हा तालेबानी वारसा
हे राज्य माफियांचे

वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकबुद्धी...
काय साली बकवास  आहे
पहा पुरोगामित्वाचा आरसा
हे राज्य माफियांचे

-प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद
(२०.८.२०१३)

Saturday, August 17, 2013

असंच असतं

जग मित्रा असंच असतं
कधी आपलं कोणीच नसतं
गर्दीत राहून हरवलं जाणं
रोज आपल्या नशीबी असतं

आधार कार्डआधार देण्याची क्षमता नाही
आधार घेण्यास पात्र नाही
इतके आपण आधारहीन
अन
आधार कार्डही आलेलं नाही