करोना - स्वगते



करोना - स्वगते

सोशल डिस्टनसिंग - सामाजिक अंतर राखणे
हे तसे आपल्याला काही नवीन नाही

वसुधैव कुटुंबकम आणि
हे विश्वची माझे घर
म्हणण्याची काळजी घेत
पूर्वापार, सर्वदूर, सर्वत्र
आपण अंतर राखुनच आहोत
धर्माचा मास्क लावत
जातीचा सॅनिटायझर वापरत
कधी लिंगभेद  तर कधी आर्थिक पायरीचं
सोवळं सांभाळत

लॉकडाऊन मुळे
आता सगळं  कसं
ऑफिशीयल झालं
नाऊ नो मोअर पर्सनल गिल्ट!
वैयक्तिक अपराध-भावनेतून सुटका झाली.
थ्यॅंक्यु सो मच, करोना!!
***
फार वर्षांपासून अपूर्ण राहिलेली माझी एक कविता 
पहिल्या काही ओळीतच अडकलेली
"जग मित्रा असंच असतं कधी आपलं कोणीच नसतं
गर्दीत राहून हरवलं जाणं रोज आपल्या नशीबी असतं"
***
आता करोनाने गर्दी संपवली
कोशात राहणा-या माझ्यासारख्यांसाठी
सोसायटीच्या दारावर २४ बाय ७ सिक्युरिटी गार्ड ठेऊन
टिश्यु पेपरने दाराचे हॅंडल बंद करून
कंफर्ट झॊन मध्ये आम्ही सेफ
वारंवार सॅनिटायझर वापरत,
मास्क लावून, गरम पाणी पित,
वीस नव्हे चाळीस सेकंद गरम पाण्याने हात धूत
स्वागत करतो आहोत कठोर निर्णयांचं
थाळ्या वाजवत, शंखध्वनी करत
आय टेल यू, इंडिया इज इन सेफ हॅन्डस!
जस्ट डोन्ट वरी.
शेवटी, राष्ट्र निर्मिती हे
येरा गबाळ्याचे काम नोहे!
***
गर्दी आहे ती गाड्या रद्द झालेल्या
बस स्थानकांवर व रेल्वे स्टेशनात
गावाकडं जाण्याची ओढ लागलेल्यांची
भारत - चुकलो -  हिंदुस्थानच्या
असहाय्य, हतबल, केविलवाण्या नागरिकांची
ज्यांच्याकडॆ आहे - आधार कार्ड
लॅमिनेट केलेले, जीवापाड जपलेले
***
शहरांनी झिडकारलेला
कोंबड्या किंवा शॆळ्या मेंढयांसारखा ट्रक मध्ये कोंबलेला
कंटेनर मधून  चोरी छिपे प्रवास करणारा
पोलिसांनी गुन्हेगार समजून
भर रस्त्यात उन्हातान्हात बसवून ठेवलेला
आरोग्यसेवकांनी औषध फवारून "शुद्ध" केलेला
आणि
गावांनी नाकारलेला
जनांचा हा प्रवाहो
हरवला आहे मधेच
"राष्ट्रीय" द्रूतगती मार्गावर
सीएए, एनपीआर आणि एनआरसी च्या साक्षीने!
***

 प्रदीप पुरंदरे
 परिवर्तनाचा वाटसरू , १ ते १५ एप्रिल २०२० 







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

आम्ही "त्यांच्या" बरोबर आहोत! तुम्ही?

पाणी मागतात ...च्यायला