आम्ही "त्यांच्या" बरोबर आहोत! तुम्ही?



जातजमात वाद व धार्मिक उन्माद,
बलात्कार व भ्रष्टाचार,
राजकीय टगेगिरी व चेल्याचपाट्यांची भांडवलशाही,
दुष्काळ, गारपिट आणि शेतक-यांच्या आत्महत्या,
रोजगार हमीतील चो-यामा-या  आणि भृणहत्या,
टॅंकरमागे धावणा-या बायाबापड्या आणि ऊसबाधा झालेले मग्रुर पुढारी
आसारामी अध्यात्म आणि सुदर्शन बाजार
असा विविधतेने नटलेला भारत देश..मेरा प्यारा हिंदोस्ता!
जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है ?
असा ‘प्यासा’ प्रश्न पुन्हा एकदा आसमंतात आहे.
तो विचारण्याचे धाडस दाखवणा-यांबरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

मोलकरणी, हमाल – माथाडी, कामगार, अंगणवाडी सेविका,  शेतकरी, शेतमजुर,
दलित, आदिवासी, शुद्रातिशुद्र आणि असहाय्य महिला
अशा असंघटितांच्या बाजूने आयुष्यभर लढणा-या ‘माणसां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

रेशन कार्ड, रोजगार, पेन्शन, सर्वांना शिक्षण, साक्षरता,
प्यायला पाणी, दुपारला भाकरी, रातच्याला वाईच अंथरूण पांघरूण.....
........... मागणं लै नाही बाप्पा
मूलभूत मागण्यांसाठी सतत आंदोलन करणा-या ‘साथी व कॉम्रेड’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

पर्यावरणस्नेही विकास
समन्यायी पाणीवाटप,
जलवंचितांच्या हक्काचं पाणी,
सहकारी साखर कारखान्यांचे खाजगीकरण,
बेछुट नागरिकरण व चंगळवाद,
शहरातील खड्ड्यात गेलेले रस्ते,
विस्थापितांचे पुनर्वसन,
छोट्या धरणांचा आग्रह,
एक ना दोन
असंख्य आघाड्यांवर संघर्ष करणा-या ‘मित्रां’बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

ज्यांच्याकडे पैसा नाही; चारित्र्य आहे
जमीन जुमला नाही; माणुसकी आहे
सत्तेची मस्ती नाही; दिनदुबळ्यांची साथ आहे
राणा भीमदेवी कंठाळी नाही; आर्जवी सूर आहे
पोकळ आश्वासने नाहीत; ठोस मागण्या आहेत
मृगजळ नाही; लॉंग मार्चची खात्री आहे
‘त्या कार्यकर्त्यां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही?

इतिहास कुस बदलतो आहे!
आपले भविष्य आपल्या हाती!!
आम्ही ‘आम आदमी’ बरोबर आहोत. तुम्ही?


प्रदीप पुरंदरे
१९ मार्च २०१४







Comments

Popular posts from this blog

लेक टॅपिंग आणि बळीराजाची लेक

पाणी मागतात ...च्यायला

करोना - स्वगते